Pages

 

Wednesday, July 29, 2009

ब्लैंक कोंल

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...(६)

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....

....संदिप

लव्हलेटर.......


लव्हलेटर.......
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं

--- संदीप खर

Tuesday, July 28, 2009

वेड लागलं मला वेड लागलं

दिसलीस वाऱ्यामध्ये आपुल्याच तोऱ्यामध्ये
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यामध्ये
वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
आता रण रण माळावर घालतो मी पिंगा
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
रोज राती दारातून कवितांचे सडे माझ्या वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
वेड लागलं आता वेड लागलं आता वेड लागलं

हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ कोण धरा झाडा नाही भान
जशी काही पाखराला दिसे दूर वीज
तिला म्हणे येना माझ्या घरट्यात नीज आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं

पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा
वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

खुळावले घरदार खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
उसळली अगं अशी झणाणली काया
जीव असा खुळा त्याला विषाचीच माया आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यातून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी सारी उपराटी तऱ्हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा..हां वेड लागलं
वेड लागलं, हां वेड लागलं, वेड लागलं, आता वेड लागलं

Sandeep Khare

जगायला एवढं...अगदी एवढंच लागतं...

खूप बोललो आता एवढंच सांग
डोळ्यांतून लागतो का मनाचा थांग ?
आठव ना पक्ष्यांचे रंगीत थवे...
मी म्हटलं - ?चंचल असतात !?
तू म्हटलंस - "आपल्याला हवेत !!"
मग छाती फुटून धावलो...धावावंच लागतं...
हातातून हात सुटून जातात, दु:ख त्याचं असतं...

कसले गं सूर ? कसले शब्द ? सारंच थोटं...
जगण्याला नसतंच धड, असलंच तर ते थोटं !
हात आहेत, पण ते हलत नाहीत
त्यांना फुलं टोचतात, काटे सलत नाहीत !
हा तुझा अणुकुचीदार ?का?? ठेवशील का बाजूला ?
भिंत बांधली गेली एवढंच खरं, एकेक वीट उपसा कशाला ?

तीन भिंती झाल्या होत्या बांधून
तेवढ्यात तू आलीस...
आणि अशी आत-बाहेर नाचते आहेस आता चिमणीसारखी
की चौथी भिंत बांधताही येत नाही......

मी ही धावायचो वार्यावर, उभा असायचो माळरानावर
मी ही पळायचो पक्ष्यांपाठी...माझ्याही घराला नव्हत्या भिंती...
असो ! आता स्पष्टीकरणे नकोत जास्त
माझीच माझ्यावर चालू आहे गस्त !

चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू आहे
अजून बांधून झाली नाही...
आत का बाहेर ते एकदाच ठरव
नंतर आतलं बाहेर नाही आणि बाहेरचं आत नाही......

अगंss भिंत असली तरी आकाश दिसतं;
आणि नीट बघीतलं तर आकाशात देव !
जगायला एवढं...अगदी एवढंच लागतं...

Sandeep Khare

आता पुन्हा पाऊस येणार....

आता पुन्हा पाऊस येणार....

आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाष काळ नीळ होणार,
मग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार, काय रे देवा.....

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार,
मग ते कोणितरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतच कळल तर बर, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार..
काय रे देवा.....

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार्,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्,
मग ते लतानी गायलेल असणार्...,
मग तूही नेमक आत्ता हेच गाण ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार्,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार्....
काय रे देवा.....

मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्....,
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्...,
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्,
काय रे देवा.....

पाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,
मग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,
एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार.....
काय रे देवा.....


पाउस गेल्यावर्शी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्शीही पडणार्....
काय रे देवा.....

Sandeep Khare

गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला

गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला ;
ती लिहाया बैसली अन्‌ मी सुचाया लागलो !

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती...
हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो !

मज न आता थोडकी आशा कुणी की "वा" म्हणा !
आज मी माझ्याचसाठी गुणगुणाया लागलो !

काय हे आयुष्य माझे, काय हे जगणे तरी,
मी मला सोडून सर्वां आवडाया लागलो...

Sandeep Khare

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यानमधील रक्त
ओल्या आठावनिंचे काही क्षण हवे असतात
चाकोरिला उध्वस्ताचे घन हवे असतात....

तसे काही चेहेर्यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी हसनार्यांचे हसने वेगले दिसते!
ओठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा
हवी असते षडाजासारखी सलग, शांत व्यथा.........

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरान्मधाल्या श्रुति
प्रेम नाही, हवी असते मला चवथी मिति!

प्रेम नाही दु:खासाठी तारण हवे असते
स्वत:वरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वथाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखल पश्चाताप!

Sandeep Khare!

उफराटे हिशोब माझे,कोणाला कळले होते

उफराटे हिशोब माझे
कोणाला कळले होते
मन ओले होते माझे
अन् म्हणून जळले होते

मी वजा जमेतून होतो
अन्‌ जमा वजेस्तव होतो
हे गणित समजले तेंव्हा
आयुष्य निवळले होते

नवनीत सुखाचे आले
शब्दांच्या पात्रांवरती
मी आईच्या हातांनी
बघ दुःख घुसळले होते

जगण्याच्या पानावरती
स्वप्नांशी जमल्या गप्पा
मग मुहूर्त मरणाचेही
कंटाळून टळले होते

दुसर्‍या दिवशी दुःखांचा
बघ वासही आला नाही
नयनांचे पेले माझ्या
रात्रीच विसळले होते

Sandeep Khare

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...

मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...

मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...

काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...

Sandeep Khare!