Pages

 

Sunday, February 28, 2010

ब~याच दिवसांनी भेटले होते

~याच दिवसांनी भेटले होते
काय बोलू काही कळत नव्हते
त्याने विचारले किती प्रेम करतेस माझ्यावर..?
नाही रे सांगता येणार शब्द नाही तेवढे पुरेसे
तू संग किती प्रेम करतोस माझ्यावर..
सागराची खोली कमी पडेल
आकाश पालथे घातले तरी
माझे प्रेम पुरून उरेल.
चालल्या होत्या गोष्टी नंतर फार
त्याच्या मनात आला एक विचार
सांग ना माझ काही उद्या बर वाईट झाल तर काय करशील.?
तरीही माझ्या वर प्रेम करशील कि मला विसरून जाशील..?
तुला आनंद होईल कि रडत बसशील .?
तिच्या मनात जाणे काय आले..
थोडी थट्टा करूया म्हणून मनात आले
मी ना मी ना!
खूप आनंदी होईन मला खूप आनद होईल.
सुटका होईल माझी मी सुखी होईन
तो पुढे काही नाही बोलला
त्याने तो विषय तिथेच सोडला
दुसर्या दिवशी ना फोन ना sms आला
फक्त एक निरोप आला
तुझ्या सुखासाठी काहीही..
जाता जाता एवढंच तो म्हणाला.
जाता जाता एवढंच तो म्हणाला.
सांगणे एवढेच कि विचार करावा बोलण्याआधी
नंतर वेळ नाही मिळत चूक सुधारण्यासाठी..

Friday, February 19, 2010

हनुमान

आक्रित विक्रित
वगैरे काय काय
घडायला लागलंय...
पोरगं येता जाता
चक्क पाया पडायला
लागलंय....||

का तर म्हणे Daddy सध्या
मी Superman नाही Hanuman आहे....
मी म्हणलं होक्का?
छान आहे!! ||


बायको म्हणाली
सोन्यासारखं पोर माझं
करतंय संस्कृतीचं रक्षण
चेष्टा सुचतीय तुम्हाला
जळ्ळं मेलं लक्षण... ||


अंजनीच्या पठिंब्याने
पवनपुत्र हसू लागला
घरातला झिरोचा बल्ब
ही त्याला सुर्याचा गोळा' दिसू लागला..... ||

रोज नवे पराक्रम..
रोज नवे उड्डाण..
बिल्डिंग हवालदील....
सोसायटी हैराण ||


संध्याकाळी घरी येताना
रोज चिंता जागलेली
कोण जाणे आज
कोणत्या लंकेला आग लागलेली... ||


शेवटी शेपूट सरसावून म्हणालो
'प्रिये हे अवघड होत चाललंय विलक्षण
हे केवळ टि. व्ही. चं खूळ आहे,
नाही संस्कृतीचं रक्षण'.. ||


म्हणाली उतरतंय जरासं खूळ तो आता जरा
At Ease होतोय..
पण मला बाई वेगळीच चिंता लागलीय
उद्या लॉर्ड कृष्णा रिलीज होतोय....||

हनुमान

रेशमाच्या बाबांनी - रेशमाच्या रेघांनीचे विडंबन

रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

चूक झाली माझी लाखमोलाची
विचारल मी ही पोर कोणाची
विसरलो आहे कोण, आहे कोण जोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाप मोऱ्यात
आणि माझ्या नरडीला, धरूनीया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

पत्रे

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

सार्तथा संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे

कवी - भाऊसाहेब पाटणकर

पुण्याची सवय झाली ...

जे खरे ते लपवण्याची सवय झाली,
या तुझ्या शहरी, जिण्याची सवय झाली!

पुस्तके ना वाचली, ना वृत्तपत्रे
रोज 'पाट्या' वाचण्याची सवय झाली

हो! मलाही लागले पाणी पुण्याचे
काय सांगू? भांडण्याची सवय झाली

कीस शब्दांचाच नुसता पाडताना
मूळ मुद्दा चुकवण्याची सवय झाली

भांडल्याविन जात नाही दिवस माझा
वाटते आता पुण्याची सवय झाली

नळ सुंदरी

नळावरच्या लायनीत काल जावच लागलं
पुरषासारखा पुरुष असुन
त्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं
वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी ऱ्हाली
तीचं करुन करुन माय कमरत वाकली
आज मग बाबुला उदबत्या विकयला धाडलं
आन माझ नशीब ह्या नळावरच आडलं
इतक्यात ती समोरुन आली...
मला थितं उभं पाहुन डोळ्यातुन हासली
तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता
आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता..
सावत्याच्या म्हातारीच आन शेजारच्या काकींच चांगलच जुंपलं होत...
हितं मात्र माझ आन तीचं एवाना बरोब्बर जुळल होतं...
पयल्यांदाच हा नळ मला गंगे सारखा वाटला होता..
काठावरचा चाळीचा शीन स्वर्गावानी नटला होता..
हा हा म्हणता दोन तास दोन मिनीटात उडाले
शेवटी माझ्याशी बोलण्यासाठी तिने ओठ उघडले..
"नंबर तुझा आहे.. पण मला भरु देशील का पाणी?"
निसत्या आवाजानचं माझ्या मनात नचु लागली गाणी..
येड्यासारखा मग मी नुसताच लाजलो
हसत हसत तिच्या मागे उभ ऱ्हायलो
घागर भरुन होताच घरी लागली जाउ
च्यायला जाता जाता म्हणली..."धन्यवाद भाऊ !!! "

आंधळा मागतो एक डोळा, आणि देव देतो गॉगल !

क्षणभराचे काम, युगायुगांचा विसावा
'देव' हा इसम बहुतेक भारतीय असावा !

गार्‍हाणी नेऊन त्याच्या दारी
मारे आपण हाकाट्या पिटतोय
तक्रारीची खिडकी बंद करून
तो आत चकाट्या पिटतोय !

'प्रोजेक्ट विश्व' पेलायची लायकी
ह्याचाच शेवटी प्रश्न उरतो
देवाच्या 'वर' कुणीच नाही तर,
त्याचे 'अप्रेजल' कोण करतो ?

हे विश्व म्हणजे काय 'पीमटी' आहे ?
की कुणीही भाड्याने चालवावी !
देवाच्या हातात किल्ल्या देऊन ,
आपण आपली लाज का घालवावी ?

अश्या गोष्टी 'आऊटसोर्स' करून,
कधीच फळ मिळत नाही..
आता बसा बोंबलत, देवाला
आपला ऍक्सेंट कळत नाही !

काही देवमाणसांकडून तो
थोडी माणूसकी घेईल काय ?
विश्वविधाता वगैरे राहू देत
साधा माणूस तरी होईल काय ?

त्याच्यावर ठेवू विश्वास, पण
त्याचा आपल्यावर बसेल काय ?
'गॉड अट वर्क' ही पाटी
स्वर्गात तरी दिसेल काय ?

देवांचे देवांसाठीचे ते राज्य
तीच तर त्याची लोकशाही !
वरवर लोकांसाठी सर्व अवतार
पण तो मूळचा पडला शेषशाही !

अभंगाचे भाषांतर

कोणे एके वेळा। विसु झाला खुळा।
करावया गेला। भाषांतर॥

अभंग तुक्याचे । करी विंग्रजीत।
दूध पीतपीत । वाघिणीचे ॥

तुका म्हणे आता। रहावे उगीच।
पहावी बरीच । मजा त्याची॥

इवल्या मुंगीची । होते आता ऍन्ट ।
झाली अंडरपॅन्ट । लंगोटीची ॥

झाला हा नाठाळ। कोण विदुषक?।
"ब्रिंग मी अ स्टिक"। तुका सेज ॥

चहाडीपुराण

चहाडीपुराणाच्या दोन गोष्टी । सांगतो तुम्हा स्पष्टी ॥
येईल तुम्हा नवद्रुष्टी । स्मरून नारदाला ॥ ध्रु ॥

सावज हेरावे बरोबर । आहे जे खरोखर ॥
साधे दिसते वरवर । पाहुनि सत्वर ॥ १ ॥

नजर असावी त्याच्यावर । लक्ष असावे खालीवर ॥
करतो जे भरभर । टिपावे नजरेने ॥ २ ॥

एखादा शब्द ऐकावा । शत्रू त्याचा जाणावा ॥
सोडुनी द्यावी ठिणगी । लबाडाची ॥ ३ ॥

बघा आता ठिणगीची मजा । करता करता देवपूजा ॥
सांगावी ही कथा दुजा । चविष्ट शब्दांनी ॥ ५ ॥

तुमचे नाव येता ( त्यांच्या ) ओठा ॥ लागलीच तेथुनी फुटा ॥
बसेल कमरेत सोटा । जबरदस्त ॥ ६ ॥


अंगावर जर आले संकट । परिस्थिती असेल बिकट ॥
तयारी ठेवा जाण्याची । दवाखान्यात ॥ ७ ॥

अपयशाला घाबरू नका । घेतला वसा टाकू नका ॥
मजा नक्की येईल । चहाडी करण्याची ॥ ८ ॥

सोडुनी द्या हातचे कर्म । मंजूर असेल माझा धर्म ॥
लागा कामाला लगेच । नारद म्हणे ॥ ९ ॥

Wednesday, February 17, 2010

पण फेसाळणा-या लाटांनी हे गुपित मला सांगितलं होतं

घोंघावणारा वारा
तुला - मला वेडावत होता
आणि किना-याच्या पाण्याने
स्व:ताच बेभान होत होता

त्याच पाण्याने तुझं
माझ्याशी गुढ संवाद साधणं
आणि झटकन जवळ येऊन
तु मला बिलगणं

मी स्वासात कंठ रोखुन
फक्त तुझ्याकडे पहात होते
हे स्वप्न की सत्य
माझे मलाच उमगत नव्हते

नाही म्हटलं तरी तु मला
तुझंच करुन टाकलं होतं
पण फेसाळणा-या लाटांनी
हे गुपित मला सांगितलं होतं

खुल्या सोनेरी ऊन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं


कवी - सुधीर मोघे

आणि तिने फक्त आयुष्यभरबरोबर राहावे माझ्यासाठी....

वाटायचे आयुष्य जगावे फक्त तिच्यासाठी,
जिवंत रहाव फक्त तिच्यासाठी,
पैसा कमवावा फक्त तिच्यासाठी,
सांगेल तस वागाव फक्त तिच्यासाठी,

तिच्या हो ला हो म्हणाव फक्त तिच्यासाठी,
तिला हव ते द्याव फक्त तिच्यासाठी,
तिला हव तेच जेवाव फक्त तिच्यासाठी,
तिला हव तिथे फिरवाव फक्त तिच्यासाठी,

स्वताहातला मी पणा मारुन टाकावा फक्त तिच्यासाठी,
स्वतहाचे अश्रू आनंदश्रू म्हणून दाखवावे फक्त तिच्यासाठी,
नेहमी सुखात आहे अस धॉंग करव फक्त तिच्यासाठी,
सगळ सोडून टिचाकडे जावं फक्त तिच्यासाठी,

आणि तिने फक्त आयुष्यभरबरोबर राहावे माझ्यासाठी....

मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं ,

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…
तुम्ही म्हणाल, यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं…
तुमचं लग्न ठरवून झालं?
कोवळेपण हरवून झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती, बिंडा किती?
याचा मान, त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….
त्या धुंदीत, त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला,
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती, असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली, खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

मग एक दिवस,
चंद्र, सूर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणार्‍या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधीच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येऊन बसलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं

कवी - मंगेश पाडगांवकर

मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं..

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं, थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं...
मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं..
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....